प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर, दि. १५ ऑगस्ट २०२६ : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर तसेच ‘हर घर तिरंगा’ आणि तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांनी विद्यालयाचा परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला.
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाची स्थापना १५ ऑगस्ट १९९६ रोजी झाली. स्वातंत्र्य दिनाबरोबरच विद्यालयाचा स्थापना दिन असल्याने यंदाचा दिवस विद्यालयासाठी दुहेरी आनंदाचा ठरला. स्थापनेपासून विद्यालयाने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैजनाथजी घोडके सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी तुळजापूरच्या तहसीलदार श्रीमती माया माने मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध संचलन करत प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. संचलनाच्या वेळी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी श्रीमती माया माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैजनाथजी घोडके तसेच पर्यवेक्षक डॉ. सुभाषजी पेटकर सर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. प्रमुख अतिथी श्रीमती माया माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पालकांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला. ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’ आणि ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली.
विद्यालयाच्या स्थापनेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिरालाही विशेष महत्त्व देण्यात आले. यंदाच्या रक्तदान शिबिरात जवळपास ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध विभागांचे कर्मचारी, SIS व सुरक्षा विभागातील कर्मचारी, पालक, महिला पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालय, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि NCC विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाप्रती अभिमान आणि राष्ट्रप्रेम व्यक्त केले.
ध्वजारोहणापासून शिस्तबद्ध संचलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि तिरंगा रॅलीपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
विद्यालयाचा स्थापना दिन आणि देशाचा स्वातंत्र्य दिन असा दुहेरी आनंदाचा सोहळा उत्साहात साजरा करत श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा यंदाही जपली.
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; शिस्तबद्ध संचलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अन् वृक्षारोपणातून राष्ट्रप्रेमाचा संदेश
