प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर तालुक्यातील काकंबा येथील सुरेखा गौतम मरके (जात – महार) यांनी गावातील श्रीकांत मनोहर काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले असून, न्याय न मिळाल्यास ८ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
निवेदनानुसार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्या शेताच्या कडेला जनावरे चारत असताना श्रीकांत मनोहर काळे हे ऊसाच्या शेतातून अचानक आले. त्यांनी महिलेचा हात धरून तिच्या छातीला व अंगाला स्पर्श करत जबरदस्तीने ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी पीडित महिलेने विरोध करून विचारणा केली असता, आरोपीने जातिवाचक शिवीगाळ करत “महारडे” अशा अपमानास्पद शब्दांचा वापर केला आणि अनुसूचित जातीबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मात्र जाताना “आज तुला कोणीतरी वाचवले, उद्या कोण वाचवणार ते पाहतो. पोलिसांत तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पीडित महिलेने तुळजापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याचे सांगितले असून, अद्याप संबंधित आरोपीविरोधात अॅट्रॉसिटीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आरोपीविरोधात तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
