भूम पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; २१४ वाहनचालकांवर कारवाई, ₹१.६३ लाखांचा दंड

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

भूम शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी भूम पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी धडक कारवाईची विशेष मोहीम राबवली. गोलाई चौक, बसस्थानक परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २१४ केसेस दाखल करून तब्बल ₹१ लाख ६३ हजारांचा दंड आकारण्यात आला.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच धाराशिव वाहतूक शाखेचे अंमलदार या कारवाईत सहभागी झाले होते.

कोणत्या नियमभंगावर कारवाई?

या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. यामध्ये—

– विना नंबर प्लेट किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने
– विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालविणे
– विना हेल्मेट दुचाकी चालविणे
– दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे
– कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणे
– काळ्या काचा असलेली वाहने
– सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणे
– मोबाईलवर बोलत वाहन चालविणे
– रहदारी व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई

अशा विविध प्रकारच्या नियमभंगांचा समावेश होता.

पोलिसांच्या पथकाची विशेष उपस्थिती

या कारवाईत परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, सपोनि गणेश खांडे, पोहेका कोळी, कवडे, शिंदे, वहील, किवंडे, डोके यांच्यासह पोलीस अंमलदार गांधले, कोरे, कलाल, यादव, जाधव, वाघमारे आणि नाईकवाडी सहभागी झाले होते.

भूम शहरातील वाढती वाहतूक, नियमभंग आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. विशेषतः हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर याबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.

वाहनचालकांना नियमपालनाचे आवाहन

कारवाईदरम्यान भूम पोलिसांच्या वतीने शहरातील नागरिक व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.

भूम पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, शहरातील वाहतूक शिस्तीला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *