प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : मुल देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून तब्बल ४७ लाख ८८ हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात सात आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सन २०२० पासून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादी धनंजय दगडू मदने, वय ३८ वर्षे, रा. सांजा चौक, हनुमान मंदिर परिसर, धाराशिव यांना विश्वासात घेतल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी मुल देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी त्यांच्याकडून २५ लाख ८८ हजार रुपये रोख आणि २२ लाख रुपये ऑनलाइन, असे एकूण ४७ लाख ८८ हजार रुपये घेतले. त्यानंतर फसवणूक करून लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात अश्विनी श्रीराम पाटील, पार्वती उत्तम देवकते, भुजंग उत्तम देवकते, रेश्मा भुजंग देवकते, श्रीदेवी दत्ता नन्नवरे, दत्ता नन्नवरे, जयश्री धुळुबा शिरगिरे आणि दत्ता गंडदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे पत्ते कार्ला, येलमवाडी, तेर आणि पुणे असे नमूद करण्यात आले आहेत.
फिर्यादी धनंजय मदने यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करीत असून, आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि इतर बाबींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
