प्रतिनिधी : प्रतीक वाघे
वाशी, दि. १५ ऑगस्ट २०२६ : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पृथ्वीराज लॉजवर मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने छापा टाकून अनैतिक देह व्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत आठ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन लैंगिक शोषणाकडे प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवी वाहतूक शाखेच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत माहिती घेऊन कायदेशीर कारवाईसाठी गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत वाशी हद्दीतील पृथ्वीराज लॉजमध्ये महिलांकडून अनैतिक देह व्यापार करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची पडताळणी केली. त्यानंतर दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजता पृथ्वीराज लॉजवर छापा टाकण्यात आला. यावेळी लॉजमध्ये आठ महिला आढळून आल्या. महिला पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात श्रीपती उत्तमराव घुले (वय ६२, रा. पारगाव), अविनाश तेजाप्पा शेट्टी (वय ३८, रा. मेंगलोर, कर्नाटक) आणि सोहेल लियाकत शेख (रा. कोपरखैरने, नवी मुंबई) हे महिलांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन लैंगिक स्वैराचारासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक मोबाईल फोन, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि रोख रक्कम २२ हजार ९५० रुपये, असा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २९ हजार ९५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९५/२०२६ नुसार बीएनएसमधील संबंधित कलमांसह कलम ३, ४ व ५ मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती मारकड, पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, श्री. शेळके, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, मपोह/८८९ गिरी, मपोह/१४६३ जाधव आणि पोना/११७६ माने, मानवी वाहतूक शाखा यांच्या पथकाने केली.
वाशीतील पृथ्वीराज लॉजवर अनैतिक देह व्यापाराचा पर्दाफाश; आठ महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
