लोहारा तालुक्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा मानवी हक्क अभियानच्या वतीने सत्कार

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे

लोहारा तालुक्यात : उत्कृष्ट कामगिरी करून प्रशासनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरुवारी रात्री ८ वाजता लोहारा येथे सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त गौरव झालेल्या कर्मचाऱ्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

मानवी हक्क अभियानचे जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार समारंभ पार पडला. लोहारा तहसील कार्यालयातील महसूल सहायक वजीर अत्तार, सेवक अशोक क्षीरसागर तसेच पोलीस पाटील तानाजी माटे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना महसूल दिनानिमित्त परंडा येथे धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मानवी हक्क अभियानच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने या तिन्ही कर्मचाऱ्यांचा लोहारा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल यांनी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करत त्यांच्या प्रामाणिक व उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. तसेच भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी मानवी हक्क अभियानचे लोहारा तालुका उपाध्यक्ष अस्लम पटेल, तालुका संघटक पांडुरंग गोरे, उमाकांत माने, विकास घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दिगंबर भिंगे, शकील पटेल, नारायण वाघे, महादेव कोकणे, संभाजी थोरात यांच्यासह मानवी हक्क अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा असून, अशा गौरवामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जनसेवेत अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *