तुळजापूरात विना परवाना परप्रांतीयांचा वाढता वावर; बेकायदेशीर कामगार, फेरी व्यवसाय व घरमालकांवर कडक कारवाईची मनसेची मागणी

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

तुळजापूर शहर तसेच संपूर्ण तालुक्यात विना परवाना वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्ती, बेकायदेशीर कामगार, फेरी व्यवसाय करणारे तसेच अशा व्यक्तींना पोलिस पडताळणीशिवाय भाड्याने घरे देणाऱ्या घरमालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय व्यक्ती कोणतीही वैध कागदपत्रे, पोलिस पडताळणी किंवा स्थानिक प्रशासनाची नोंद न करता बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आहेत. या व्यक्ती शहरातील विविध हॉटेल्स, खानावळी, बांधकाम साईट्स, फेरी व्यवसाय, पाणीपुरी, भेळ, चाट तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रीसारख्या ठिकाणी विना नोंदणी काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.


तसेच अनेक जण रस्त्यावर अनधिकृत गाड्या, ठेले व हातगाड्यांद्वारे व्यवसाय करत असून, कोणतीही परवानगी किंवा प्रशासनाची नोंद नसताना शहरात वास्तव्य करत आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याशिवाय शहरातील अनेक घरमालकांकडून या परप्रांतीय व्यक्तींना कोणतीही पोलिस पडताळणी न करता भाडेतत्त्वावर घरे देण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ही बाब नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.


अनेक ठेकेदार विना नोंदणी आणि विना परवाना या परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवत असून, कामगार कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी होत असून बेरोजगारी वाढीस लागल्याचे सांगण्यात आले.


मनसेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की, शहरातील सर्व भाडेकरूंची पोलिस पडताळणी सक्तीची करावी, बेकायदेशीर फेरी व्यवसायावर कारवाई करावी, हॉटेल्स, खानावळी व बांधकाम साईटवरील कामगारांची तपासणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालक, ठेकेदार व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.


या निवेदनामुळे तुळजापूर शहरातील बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *