प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : माहेरहून गाडी घेण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे आणावेत, या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येडशी (ता. जि. धाराशिव) येथे घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विवाहितेचे नाव आरती धीरज पवार असे असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या येडशी येथील रहिवासी होत्या. १ नोव्हेंबर २०२२ पासून ते १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजेपर्यंत त्यांचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
“माहेरहून गाडी घेण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊन ये,” अशी मागणी करत आरोपींकडून आरती यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या कथित शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आरती यांनी १३ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर मयत आरती यांच्या आई आशा बाळासाहेब कदम (वय ४०, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून पोलिसांनी धीरज श्यामसुंदर पवार (पती), आशा श्यामसुंदर पवार (सासू) आणि श्यामसुंदर उर्फ पोपट पवार (सासरे), सर्व रा. येडशी, ता. जि. धाराशिव, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८५, ३५१(१), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेमुळे येडशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विवाहितेच्या आत्महत्येमागील नेमकी परिस्थिती आणि आरोपांची सत्यता तपासण्यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
येडशीत सासरच्या छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल
