शेतकरी पुत्र मनोज जाधव आक्रमक; अंदूर बोगस खत प्रकरणात खत विक्रेता, कंपनीसह कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील कथित बोगस खत विक्री प्रकरणावरून आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी निवेदन देत संबंधित खत विक्रेता व कंपनीसोबतच कृषी विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, १८ जून २०२६ रोजी अंदूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे ४०० ते ५०० बॅग कथित बोगस खत खरेदी केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदार व खत कंपनीविरोधात कारवाईचे आदेश दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


मात्र, या प्रकरणात केवळ विक्रेता आणि कंपनीवर कारवाई न करता संबंधित कृषी विभागातील अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे. तुळजापूर तालुका कृषी विकास अधिकारी, गुणनियंत्रक अधिकारी तसेच नळदुर्ग व अंदूर येथील कृषी सहाय्यक यांच्यावर निष्काळजीपणाबाबत कारवाई करून निलंबन करावे, तसेच प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


याबाबत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती कृषिमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच लोकायुक्त व उपलोकायुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले.


“शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित या गंभीर प्रकरणात १५ दिवसांच्या आत ठोस कारवाई झाली नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा मनोज जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *