प्रतिनिधी : प्रतीक वाघे
भूम : भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एकाचवेळी तब्बल १० ठिकाणी ‘मास रेड’ केली. या कारवाईत गावठी हातभट्टी दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन असा एकूण ८७५ लिटर मुद्देमाल, अंदाजे ७५ हजार ५०० रुपये किमतीचा, जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी एकूण १० आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसोली, दिंडोरी तसेच भूम शहरातील इंदिरानगर आणि कल्याणनगर पारधी पिढी परिसरात पोलिसांनी एकाचवेळी धाडी टाकल्या. अवैध हातभट्टी व दारू विक्रीच्या ठिकाणांवर अचानक कारवाई करत पोलिसांनी संबंधितांकडून दारू व दारू तयार करण्यासाठीचे सडवा रसायन जप्त केले.
८७५ लिटर मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी २७५ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. या दारूची अंदाजे किंमत २७ हजार ५०० रुपये आहे. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ४८ हजार रुपये आहे.
अशा प्रकारे दारू व रसायन मिळून एकूण ८७५ लिटर मुद्देमाल, किंमत ७५ हजार ५०० रुपये, पोलिसांनी जप्त करून जागीच नष्ट केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी भूम श्री. अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. API खांडे व PSI बर्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली.
कारवाईमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल कवडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्ला, पोलीस अंमलदार कलाल, कवडे, कोरे, जाधव तसेच इतर पोलीस स्टाफ सहभागी झाला होता.
अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा
भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू निर्मिती तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
भूम पोलिसांच्या या एकाचवेळी झालेल्या ‘मास रेड’ कारवाईमुळे अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
