प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवत, भ्रष्टाचार व अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी, “दडपशाही करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. भ्रष्टाचार आणि अन्यायाविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील.
कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांना ‘देशद्रोही’ म्हटल्याचा गंभीर आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य वाहिलेल्या माजी सैनिकांचा अवमान सहन केला जाणार नाही. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
समितीने प्रशासनावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप करत, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.
न्याय मिळाला नाही, तर जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
पत्रकार परिषदेला समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासनासाठी संघटितपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
