प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 25 लाख 36 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित गोवा गुटखा, च्युइंग टोबॅको आणि स्कॉर्पिओ वाहन जप्त केले असून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांना 12 जुलै 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एमएच-25 बीएफ-3696 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गोवा गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत स्कॉर्पिओ वाहनातून ‘डायरेक्टर’ पान मसाल्याच्या 40 गोण्या (1,800 पॅकेट) आणि ‘SHOT Luxury Chewing Tobacco’च्या 40 गोण्या (1,800 पॅकेट) असा एकूण 10 लाख 36 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. तसेच 15 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 25 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी गणेश मारुतीराव धुमाळ (वय 34, रा. उपळाई रोड, एकता गणपती चौक, बार्शी, जि. सोलापूर), रोहन रविंद्र कदम (रा. आळणी), जाफर जमादार (रा. आळण, राज्य कर्नाटक), अमोल गुंजाळ आणि पवन जीवन पौळ (रा. आळणी, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 319/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 274, 275, 223 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दराडे, पोलीस अंमलदार माळी व पोलीस अंमलदार जाधवर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध गुटखा वाहतूक आणि विक्रीविरोधात धाराशिव पोलिसांनी सुरू केलेल्या कारवायांमुळे अशा बेकायदेशीर व्यवसायाला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
