धाराशिव जिल्ह्यातील उपोषणकर्त्यांच्या आंदोलनाला मानवी हक्क अभियानाचा जाहीर पाठिंबा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love

प्रतिनिधी प्रतिक वाघे

धाराशिव : दिल्ली येथे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत मानवी हक्क अभियान, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने आंदोलन व उपोषण करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे.

अशा परिस्थितीत दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर कथितपणे करण्यात आलेली बळाचा वापराची कारवाई व कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन अत्यंत निषेधार्ह असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


मानवी हक्क अभियानाच्या वतीने सोनम वांगचुक व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकहिताच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या शांततापूर्ण उपोषणाचे कौतुक करण्यात आले असून, त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला संघटनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.


तसेच, आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, त्यांच्याशी कायद्याच्या चौकटीत व मानवी हक्कांचा सन्मान राखून वर्तन करावे आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी मानवी हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *