प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा फिर्यादीचा ओळखीचा आणि किराणा दुकानात काम करणारा कामगारच निघाल्याने खळबळ उडाली आहे.
दि. २८ मार्च २०२६ रोजी दाळींब येथे फिर्यादी हृषिकेश जाधव (रा. लातूर) यांची गाडी ६ अनोळखी इसमांनी अडवून त्यांना व त्यांच्या चालकाला बेदम मारहाण केली. मुरूम येथून माल उतरवून मिळालेली १,१४,००० रुपयांची रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने लुटून नेली होती. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ३१ मार्च रोजी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९, रा. कंटेकूर) हा मुरूम येथील उज्वला किराणा दुकानात काम करत होता. फिर्यादीकडे मोठी रोख रक्कम असल्याचे त्याने पाहिले आणि ही माहिती आपल्या साथीदारांना देत दरोड्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी मोटारसायकल व पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारने पाठलाग करून दाळींब येथे महामार्गावर गाडी अडवली आणि मारहाण करून रक्कम लुटली.
या प्रकरणात अभिषेक कावडे व दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, रा. कंटेकूर) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २०,००० रुपये रोख व दोन मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित ६ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
