धाराशिव कृषी विभागात 15 अधिकारी निलंबित! ‘बडा मासा’ अजूनही मोकाट? मनोज जाधवांचा कृषिमंत्र्यांना इशारा!

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव, दि. ९ : धाराशिव जिल्हा कृषी विभागातील कथित अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणात तब्बल १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही या प्रकरणातील आणखी एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी केला आहे. त्यामुळे १५ अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईनंतर आता या प्रकरणातील कथित ‘बडा मासा’ कोण? आणि त्याच्यावर कारवाई कधी होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कृषी विभागातील अनियमितता, कथित गैरप्रकार आणि शेतकऱ्यांशी संबंधित योजनांमधील पारदर्शकतेचा मुद्दा मनोज जाधव यांनी सातत्याने उपस्थित केला आहे. ज्या प्रकरणातून या संपूर्ण विषयाला सुरुवात झाली, त्या प्रकरणाशी संबंधित जबाबदार व्यक्तींवरही निष्पक्ष चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“१५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली, ही कारवाईची सुरुवात आहे. मात्र, जर या प्रकरणातील प्रमुख जबाबदारी असलेल्या व्यक्तीपर्यंत चौकशी पोहोचली नाही, तर संपूर्ण प्रकरणाला न्याय मिळाला असे कसे म्हणता येईल?” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

‘बड्या माशावर’ कारवाईची मागणी

या प्रकरणाची व्याप्ती केवळ निलंबित अधिकाऱ्यांपुरती मर्यादित न ठेवता, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनोज जाधव यांनी केली आहे. संबंधित प्रकरणात कोणाची भूमिका होती, निर्णय प्रक्रियेत कोण जबाबदार होते आणि कथित गैरप्रकारामागे नेमकी यंत्रणा काय होती, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. संबंधित ‘बड्या माशावर’ कारवाई होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा जाधव यांनी दिला.

कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची लवकरच भेट

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे राज्य सरकारसमोर मांडण्यासाठी आपण लवकरच कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले.

या भेटीदरम्यान कृषी विभागातील कथित अनियमिततेबाबतची माहिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतचे मुद्दे सरकारसमोर मांडून निष्पक्ष चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“१५ जणांवर कारवाई झाली, पण ‘तो’ अजूनही बाहेरच का?”

१५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता या प्रकरणातील पुढील कारवाईकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. निलंबित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त आणखी कोणाची भूमिका चौकशीत समोर येते? कथित मुख्य जबाबदार व्यक्तीपर्यंत चौकशीचा फास पोहोचतो का? आणि राज्य कृषी विभाग याप्रकरणी पुढे कोणती भूमिका घेतो?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“शेतकऱ्यांच्या पैशांशी आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न असेल, तर शेवटपर्यंत आवाज उठवणार. दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याची बाजू अथवा अधिकृत चौकशी अहवाल उपलब्ध झाल्यास त्याचाही समावेश करून या प्रकरणाचे वस्तुनिष्ठ चित्र समोर येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *