तुळजापूर नगरपरिषदेसमोर 6 जुलैला लाक्षणिक उपोषण ‘सार्वजनिक जागा वाचवा’ची नागरिकांची हाक

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर शहरातील जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने तसेच माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. 6 जुलै 2026 रोजी तुळजापूर नग

रपरिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असलेली जागा वाचविणे, संबंधित बांधकाम परवानगी रद्द करणे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तुळजापूर येथील सिटी सर्वे क्र. 972 मधील एकूण 2364.30 चौ.मी. क्षेत्रापैकी 731 चौ.मी. जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार 30 नोव्हेंबर 1978 रोजी संबंधित जागेचे कायदेशीर भूसंपादन करण्यात आले होते आणि त्याचा मोबदला भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता.


सदर जागेवर महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले असून उर्वरित जागा अनेक वर्षे भाजी मंडईसाठी सार्वजनिक वापरात होती. मात्र, नगर रचनाकार धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादन झालेली व पंचनाम्याद्वारे नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आलेली जागा असतानाही मूळ मालकास बांधकाम परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी व्यापारी संकुल व लॉजिंग उभारण्यात आले. संबंधित जागेचा कायदेशीर मालक नगरपरिषद असल्याचे कागदपत्र उपलब्ध असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.


याप्रकरणी नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी आणि नगर अभियंत्यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता किंवा माहिती असूनही बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम परवाना तातडीने रद्द करून सिटी सर्वे क्र. 972 मधील 731 चौ.मी. सार्वजनिक जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन ती नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, भूसंपादनाशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे अथवा सापडत नसल्याचे उत्तर आजही संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


या आंदोलनाबाबतचे निवेदन दि. 29 जून 2026 रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश भैय्या जाधव, शहाजी काका भांजी आणि विकास शिंदे उपस्थित होते.


“जनतेच्या सार्वजनिक हक्काची जागा वाचवा, नागरिकांचा हक्क अबाधित ठेवा” या घोषवाक्यासह जवाहर गल्लीतील नागरिक, आजी-माजी नगरसेवक तसेच तुळजापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *