६२ लाखांचा गुटखा-सुगंधीत तंबाखू जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची येरमाळा परिसरात धाडसी कारवाई

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे

डोंगरातील तलावाजवळ ताडपत्रीखाली लपवलेला मुद्देमाल उघड; एक आरोपी ताब्यात, अन्य फरार


धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा गुटखा व सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयित डोंगराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.


मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार स्थागुशाचे पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, येरमाळा परिसरातील वडजी शिवारात डोंगराजवळील तलाव परिसरात लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.


माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. भालेराव यांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरात सापळा रचून छापा टाकला असता ताडपत्रीवर सात ते आठ इसम बसलेले दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी पळ काढला.


पोलीस पथकाने पाठलाग करून एका इसमास पकडले. त्याची ओळख छगन बिसराम शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) अशी पटली. चौकशीत त्याने ताडपत्रीखाली गुटख्याची पोती असल्याची कबुली दिली. तसेच तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी येथील काही इसम व मस्सा येथील एका व्यक्तीसोबत मिळून हा मुद्देमाल आणल्याची माहिती दिली.


पोलिसांनी ताडपत्री हटवून पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ‘राजनिवास’ गुटखा व सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यासोबतच तीन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. एकूण ६२,४८,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताब्यातील आरोपी छगन बिसराम शिंदे यास पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.


ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि श्री. तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महेबुब अरब, रोहित दंडनाईक व प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *