प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर :
तुळजापूर शहरातील गट नंबर 138/1 मधील 2 हेक्टर 63 आर जमिनीवरील कथित बेकायदेशीर विकास, अनधिकृत बांधकामे आणि संशयित खरेदी-विक्री व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, नगर परिषद सदस्या सौ. प्रगती गोपाळ लोंढे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
सदर निवेदनात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 52 व 53 अंतर्गत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जास्तीत जास्त शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच गट नं. 138/1 मधील सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, या प्रकरणात माजी उपनगराध्यक्ष पंडित देविचंद जगदाळे यांच्यासह एकूण 26 जणांविरोधात आरोप करण्यात आले असून, बनावट दस्तऐवज, खोटे निवेदन, चुकीचे शपथपत्र, शासनाची दिशाभूल व आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या अहवालात नगर रचनाकार धाराशिव यांनी मंजूर केलेल्या मूळ भुअभिन्यासात आणि खरेदीखतासोबत जोडलेल्या आराखड्यात तफावत आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधितांनी सादर केलेला विकास आराखडा अधिकृत मंजुरीपेक्षा वेगळा असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे.
तसेच या समितीने संबंधित जमिनीचे व्यवहार, हस्तांतरण आणि नगरपालिकेकडून देण्यात आलेले काही परवाने हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे नमूद करत ते रद्द करण्याची शिफारस केली आहे.
यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीनेही या प्रकरणाची चौकशी केली होती. समितीने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम तसेच भारतीय नोंदणी अधिनियम 1908 च्या नियम 82 व 83 नुसार संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषद तुळजापूर व सह जिल्हा निबंधक कार्यालयाला दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात संबंधितांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बेकायदेशीर बांधकामे हटवावीत आणि संशयित खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करून आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सौ. प्रगती लोंढे यांनी केली आहे.
