धाराशिवच्या सर्वांगीण विकासाला नवी गती; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे मुदतबद्ध कामांचे निर्देश

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रत्येक प्रकल्पाची मुदतबद्ध अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


बैठकीत तुळजापूर येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय प्रकल्प, आवश्यक परवानग्या, निधीची उपलब्धता तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या जमिनीशी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भाविक आणि स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रकल्पाला गती देण्यावर भर देण्यात आला.


जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित विठ्ठल मूर्ती प्रकल्प, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांवरही सखोल चर्चा झाली. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील गड-किल्ल्यांच्या संवर्धन व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.


बैठकीत मराठा समाज मंदिरासाठी जागा निश्चित करणे, तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारणे, जनावरांसाठी आधुनिक स्मशानभूमी विकसित करणे, धर्मवीर आनंद दिघे थीम पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.


साडेसांगवी पुलाला निधीची सकारात्मक ग्वाही
साडेसांगवी येथील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक निधीबाबत ग्रामविकास विभागाने लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. या पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.


१५ ऑगस्टपर्यंत नासा अभ्यासदौऱ्यासाठी २० विद्यार्थ्यांची निवड
धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. येत्या १५ ऑगस्टपर्यंत नासा (अमेरिका) अभ्यासदौऱ्यासाठी २० विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.


बैठकीच्या शेवटी प्रत्येक विभागाने निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करावी. विकासकामांमध्ये कोणताही अडथळा राहू नये आणि सर्व विभागांनी समन्वयाने काम करून धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.


या बैठकीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुरातत्त्व विभाग, नगरपरिषद, पशुसंवर्धन विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *