हंगरगा येथील रेल्वे कामामुळे शेतकऱ्यांचा संताप; शेतीकडे जाणारा रस्ता बंद, चिखलामुळे दोन गावांचा संपर्कही विस्कळीत

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


हंगरगा परिसरात सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे कामादरम्यान दोन गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


रेल्वेच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून संपूर्ण मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणी, खत व बियाणे ने-आण करणे तसेच कृषी अवजारे आणि वाहनांची वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले आहे.

अनेकांना पर्यायी मार्गाने मोठा वळसा घालून जावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक नुकसानही होत आहे.


विशेष म्हणजे हा रस्ता दोन गावांना जोडणारा प्रमुख संपर्क मार्ग असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


ग्रामस्थांनी संबंधित रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा बंद रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.


शेतकऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *