प्रतिनिधी : प्रतीक वाघे
रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडून तेलाचे डबे व अन्य किराणा माल चोरणाऱ्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत तब्बल 6 लाख 59 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 3 जुलै 2026 रोजी मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास व पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली. कन्हेरवाडी पाटी येथील सुभाष भिमराव काळे याने साथीदारांसह काही दिवसांपूर्वी चोरीचा माल इनोव्हा कारमधून आणून आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच संबंधित आरोपी येरमाळा येथे इनोव्हा कारसह असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुभाष भिमराव काळे (वय 34, रा. कन्हेरवाडी पाटी), अनिल रमेश शिंदे (वय 29, रा. मस्सा) आणि अरुण बचन शिंदे (वय 28, रा. मोहा) यांचा समावेश आहे.
सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी रूई (डोकी) येथील किराणा दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या सांगण्यावरून कन्हेरवाडी पाटी येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून विविध कंपन्यांचे 13 तेलाचे डबे, घडी डिटर्जंट व घडी स्मार्ट निरमा पावडर असलेल्या निळ्या व लाल रंगाच्या 8 पिशव्या तसेच चोरीसाठी वापरलेली इनोव्हा कार असा एकूण 6,59,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सपोनि सचिन खटके, सपोनि स्वप्नील वाळके, पोहेकॉ विनोद जानराव, नितीन जाधवर, अमोल निंबाळकर, बबन जाधवर, मनोज जगताप, महिला पोलीस हवालदार शोभा यांगर, पोलीस अंमलदार महेबूब अरे आणि रोहित दंडनाईक यांनी सहभाग घेतला.
