प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ६ ऑगस्ट : उमरगा तालुक्यातील बोरी येथे तानाजी मदने व त्यांच्या पत्नीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मानवी हक्क अभियान, धाराशिव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तानाजी मदने व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन कालावधी उलटूनही या प्रकरणातील सर्व आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तपासाला गती देऊन सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः हल्ल्याच्या वेळी दोन चारचाकी वाहनांतून घटनास्थळी आलेल्या १० ते १२ अनोळखी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची ओळख पटवावी, तसेच या व्यक्तींची भूमिका तपासून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष व सखोल तपास करण्यात यावा. हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी व्यक्ती आणि त्यांना मदत करणाऱ्यांची माहिती तपासातून समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मानवी हक्क अभियानाने मांडली.
पीडित दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा मानवी हक्क अभियानाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल, मुख्य सल्लागार अरुणकुमार माने, लोहारा तालुका उपाध्यक्ष असलम पटेल, आर. डी. राऊत तसेच दयानंद बनसोडे उपस्थित होते.
आता पोलिसांकडून या प्रकरणातील उर्वरित आरोपींच्या अटकेसह १० ते १२ अनोळखी हल्लेखोरांचा शोध कसा घेतला जातो आणि तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
बोरीत मदने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला!
१०-१२ हल्लेखोरांचा शोध कधी?
आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनाचा इशारा!
