दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजुरांना घरकुलाच्या जागेचा मालकी हक्क द्या; ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव, दि. ११ जून :

लोहारा तालुक्यातील मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या जागेचा मालकी हक्क (कबाला) देण्यात यावा, या मागणीसाठी ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे दस्तापूर येथील गट क्रमांक ९८ मधील २५ आर जमीन शासनाने सन १९६५ मध्ये भूमिहीन शेतमजुरांच्या पुनर्वसन व निवासासाठी राखीव ठेवली होती.

या जागेवर अनेक वर्षांपासून भूमिहीन शेतमजूर कुटुंबे वास्तव्यास असून त्यांनी स्वतःची घरे उभारून स्थिर जीवन निर्माण केले आहे. मात्र, इतका कालावधी उलटूनही संबंधित कुटुंबांना त्यांच्या वास्तव्याच्या जागेचा अधिकृत मालकी हक्क अद्याप मिळालेला नसल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली.


मालकी हक्क नसल्यामुळे नागरिकांना घरकुल, पायाभूत सुविधा, विविध शासकीय योजना तसेच अन्य प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले.


भूमिहीन शेतमजूर वसाहतीचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र रहिवाशांना नियमानुसार मालकी हक्क प्रमाणपत्र (कबाला) देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


हे निवेदन ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्रीरंग केरनाथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी नागिण थोरात, अलका लोंढे, पार्वती झुंजारे, छबुबाई देडे, भारताबाई लोंढे, शिवाबाई झुंजारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *