प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार व वेळेवर एसटी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी तुळजापूर आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे जागृत शक्तीपीठ असून वर्षभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा तसेच प्रत्येक पौर्णिमेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, तुळजापूर आगाराकडे उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या अपुरी असल्याने अनेक भाविकांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुळजापूर आगाराला नवीन बसेसचा ताफा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी तुळजापूर शहरात ये-जा करतात. सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळेत बसफेऱ्या अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा वेळेवर महाविद्यालय किंवा शाळेत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच नवरात्रोत्सव, चैत्र पौर्णिमा आणि इतर धार्मिक उत्सवांच्या काळात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता विशेष एसटी बसेसची व्यवस्था करावी, जेणेकरून भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अमोल जाधव यांनी केलेल्या प्रमुख मागण्या :
तुळजापूर आगाराला नवीन एसटी बसेसचा ताफा उपलब्ध करून द्यावा.
ग्रामीण भागातून तुळजापूरकडे येणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये वाढ करावी.
नवरात्रोत्सव, पौर्णिमा व इतर गर्दीच्या काळात विशेष एसटी बसेस सुरू कराव्यात.
या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास तुळजापूर तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुविधाजनक होईल, असा विश्वास अमोल जाधव यांनी व्यक्त केला आहे.
