येडेश्वरी यात्रेत यात्रेकरूंना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ३ आरोपी अटकेत

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेदरम्यान यात्रेकरूंना अडवून लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी पर्दाफाश केला असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दि. ०१ एप्रिल ते ०४ एप्रिल २०२६ दरम्यान येडेश्वरी यात्रेत आलेल्या यात्रेकरूंना आळणी शिवार व कुसळंब-धानोरा रोड परिसरात अडवून लुटण्याच्या तसेच मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.


दि. ११ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोहा व आळणी परिसरातून ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी यात्रेकरूंना अडवून लुटल्याची व मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.


आरोपींनी यात्रेदरम्यान आळणी शिवार व कुसळंब-धानोरा रोड परिसरात यात्रेकरूंना लक्ष्य करत लूट केल्याचे तसेच येरमाळा शहरातून दोन मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पोलीसांनी आरोपींकडून दोन सोन्याचे डोरले, एक मोबाईल व दोन मोटारसायकली असा एकूण १,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे दोन जबरी चोरी व दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आनंद शामराम पवार (वय २७), शुभम शामराव पवार (वय २५, दोघे रा. आळणी, ता. जि. धाराशिव) व बबन शहाजी काळे (वय २८, रा. मोहा, ता. कळंब) अशी असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.


सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *