10 कोटींच्या हशिश ऑईल तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागातून जेरबंद; धाराशिव पोलिसांची धाडसी मोहीम यशस्वी

Spread the love

धाराशिव : प्रतीक वाघे

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीसांनी तब्बल 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक करत मोठी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


दि. 19 एप्रिल 2026 रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना संशयित वाहनचालकांनी पोलिसांना पाहताच त्यांच्या ताब्यातील हशिश ऑईलने भरलेली बॅग कारमधून फेकून घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदर अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 अन्वये NDPS कायद्यातील कलम 8(क), 20(ब), 20(ii)(C), 25 व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तांत्रिक तपासाद्वारे या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली होती. यापूर्वी या गुन्ह्यातील दोन आरोपींना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून अटक करण्यात आली होती.


मात्र, हशिश ऑईलचा मूळ पुरवठादार कोण, तो कुठे राहतो आणि त्याची ओळख काय, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान पोलिसांना ओडिशा राज्यातील प्रसेनजित ख्रिमहन दास हा मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाली. मात्र त्याच्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नव्हती.


यानंतर दि. 06 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अंमलदार महेबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांचे विशेष पथक ओडिशा राज्यात रवाना झाले.


तपासादरम्यान आरोपी हा ओडिशातील जनतापाई परिसरातील अतिशय दुर्गम, पहाडी आणि नक्षलप्रभावित भागात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि मोठ्या धाडसाने पोलिसांनी त्या भागात शोधमोहीम राबवून दि. 08 मे 2026 रोजी मुख्य आरोपी प्रसेनजित ख्रिमहन दास (वय 33, रा. ओडिशा) याला ताब्यात घेतले.


सदर आरोपीला पुढील चौकशी आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीच्या साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *