प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर प्रभावी जनजागृती करण्यासह तालुकास्तरावर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येणाऱ्या “तालुका आरोग्य संपन्न कृतीदल” समितीत तुळजापूर तालुक्यासाठी पत्रकार श्रीकांत कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर लोकमंगल समूहाच्या वतीने पत्रकार श्रीकांत कदम यांचा शाल, श्रीफळ व पेढा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमंगल समूहाचे संचालक सचिन आडगळे, विनोद देवकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, राहुल साळवे, आशुतोष लबडे, नगरसेवक मधुकर शेळके तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी तालुकास्तरावर आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पत्रकार श्रीकांत कदम यांच्या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यात आरोग्य विषयक विविध उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या श्रीकांत कदम यांच्या या निवडीमुळे तुळजापूर तालुक्यातील आरोग्यविषयक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
