लॉजवर पोलिसांचा छापा; नायगाव मुरुड मार्गावरील रॉयल लॉजवर अनैतिक देह व्यापारातून दोन महिलांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


धाराशिव : नायगाव ते मुरुड मार्गावरील रॉयल लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक देह व्यापारावर शिराढोण पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज चालक व मॅनेजर अशा दोघांविरुद्ध मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर यांच्या पथकाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी गस्त सुरू केली होती. यावेळी नायगाव शिवारातील रॉयल लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.


मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवून माहितीची खात्री केली. माहितीची खात्री झाल्यानंतर ११ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१६ वाजता पोलिस पथकाने लॉजवर छापा टाकला.

यावेळी लॉजमध्ये दोन महिला आढळून आल्या. महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची चौकशी केली असता, आरोपी अक्षय दादासाहेब घोगरे (रा. मुरुड, ता. जि. लातूर) आणि लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ (रा. मुरुड, ता. जि. लातूर) यांच्या सांगण्यावरून महिलांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.


कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, नोंद रजिस्टर, रोख रक्कम ५ हजार ३०० रुपये व इतर साहित्य असा एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


या प्रकरणी आरोपी अक्षय घोगरे व अजय रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमांसह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३, ४, ५ व ६ प्रमाणे तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कोळेकर व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *