प्रतिनिधी : प्रतीक वाघे
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांविरोधात महाविकास आघाडी तुळजापूर, नागरिक आणि भक्तांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने रस्त्यात अडवून दिवसा तसेच रात्री लूटमारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच शहरातील भर चौकात आणि रहदारीच्या मार्गांवर मारहाण, खुनाचे प्रयत्न, हात-पाय मोडणे, डोकी फोडणे अशा गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे.
याशिवाय शहरात अवैध दारू, गांजा, ड्रग्स विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी अवैध शस्त्रे आणि पिस्तुलांचा वापर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे.
महिला, लहान मुले आणि तरुण विद्यार्थिनी यांना शहरात सुरक्षितपणे वावरणे कठीण झाले असून, बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस विभाग व गुप्तचर यंत्रणा या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून झालेल्या चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचेही सांगण्यात आले.
तुळजापूर शहरातील नागरिक व भाविकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, वाढत्या गुन्हेगारीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरात प्रभावी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना ॲड. धीरज पाटील, अशोक मगर, अमोल कुतवळ, ऋषिकेश मगर, नागनाथ भांजी, आनंद जगताप, रणजीत इंगळे, सुधीर कदम, उत्तम नाना, अमृतराव व सुदर्शन वाघमारे आदी उपस्थित होते.
