धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा सर्वात मोठा ‘जुगार अड्डा’ उद्ध्वस्त कळंबमध्ये धडक कारवाई, ५९ जणांवर गुन्हा दाखल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे


धाराशिव जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कळंब परिसरातील क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या भव्य जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली.

या कारवाईत तब्बल ५९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी १९ लाख ९६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


क्लबच्या परवान्याचा गैरवापर करत सुरू होता जुगार
कळंब–ढोकी रोडवरील हॉटेल हिमालय बारच्या शेजारी असलेल्या ‘संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’ येथे क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर करून तीन पत्ती (तिरट) जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.


माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन करून विशेष पथकाच्या मदतीने छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जुगार अड्ड्यावर उपस्थित असलेल्यांची मोठी धावपळ उडाली.


५४ जण रंगेहात ताब्यात; संचालकांसह ५९ जणांवर कारवाई
या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ५४ जणांना ताब्यात घेतले, तसेच क्लबचे ५ संचालक यांच्यावरही कारवाई करण्यात आली. सर्व मिळून ५९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रोख रक्कम, वाहने आणि जुगार साहित्य जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण १९ लाख ९६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी


या धडक कारवाईत पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, तसेच आरसीपी (RCP), क्यूआरटी (QRT) पथकातील अधिकारी, अंमलदार आणि चालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा कठोर इशारा
धाराशिव जिल्ह्यात जुगार, मटका, अवैध दारू, हातभट्टी आणि अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, यापुढेही अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात गोपनीय माहितीच्या आधारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *