प्रतिनिधी : प्रतीक वाघे
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबे तडवळे शिवारात शासकीय मोजणीचे काम सुरू असताना वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण, धमकी देणे तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास दत्तात्रय पवार, विमल विलास पवार आणि श्रीधर विलास पवार (सर्व रा. कसबे तडवळे, ता. जि. धाराशिव) यांनी दि. 25 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 1.15 वाजण्याच्या सुमारास कसबे तडवळे शिवारातील गट क्रमांक 76 व 77 येथे सुरू असलेल्या मोजणीच्या कामाच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे.
फिर्यादी संभाजी जयराम तोगरे (वय 41 वर्षे, रा. धामणगाव, ता. जळकोट, जि. लातूर) हे आपल्या स्टाफसह बांधावर मोजणीचे काम करत असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आरोपींनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी संभाजी तोगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 226, 221, 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
