धाराशिव : छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीअंतर्गत गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता धाराशिव येथील ग्रामीण पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली.
वार्षिक तपासणीच्या निमित्ताने त्यांनी सर्वप्रथम धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यास भेट देऊन येथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करून परिसर सुस्थितीत ठेवला होता. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला असून दर्शनीय भागावर विविध सूचना फलक लावण्यात आले असल्याची माहिती तपासणीदरम्यान देण्यात आली.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा विभाग, कॅश मोहरर, क्राईम मोहरर यांच्या कामकाजाची तपासणी केली. तसेच गुन्हे नोंद, गुन्ह्यांची निर्गती, अर्ज निर्गती, गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई, अभिलेख अद्ययावत ठेवणे आदी बाबींचा आढावा घेतला. जुने अभिलेख वर्गवारी करून त्यांची नोंद ठेवणे, निकामी अभिलेखांचा नाश करणे तसेच बेवारस वाहनांची निर्गती करण्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
तपासणीदरम्यान त्यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस पाटील यांचा दरबार घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक मार्गदर्शन केले.
याच वेळी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटनही विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राऊत तसेच पोलीस निरीक्षक श्री. मोरे व धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, धाराशिव येथेही भेट देऊन कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. तसेच महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या पिंक पथकाच्या कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला आणि परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
वार्षिक तपासणीदरम्यान पोलीस ठाणे व कार्यालयातील कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची वार्षिक तपासणी
