जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर मुख्य डाकघरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; ३५ देशी वृक्षांची लागवड

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे

सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर विभाग आणि मुख्य डाकघर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोलापूर मुख्य डाकघर परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. सकाळी ८ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात मुख्य डाकघर परिसरातील स्वच्छता अभियानाने करण्यात आली. यावेळी सोलापूर शहराच्या उपमहापौर तथा पर्यावरण रक्षक सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच डॉ. मनोज देवकर (संस्थापक, इको नेचर क्लब) आणि सौ. वर्षा खडकेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी तसेच गार्डनर श्रीमती रमा गायगवळी यांचा नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रमुख पाहुणे व अतिथींनी पोस्ट ऑफिसला २० विविध जातींच्या देशी वृक्षांची भेट दिली.

त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी आणखी १५ विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प व्यक्त केला.


यावेळी मार्गदर्शन करताना उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी मुख्य डाकघर परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे, वृक्षांच्या निगेचे तसेच स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. त्यांनी मुख्य डाकघराच्या ऐतिहासिक हेरिटेज इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

कर्मचारी व ग्राहकांच्या सुविधांसाठी ओपन जिम तसेच महिला कर्मचारी व ग्राहकांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.


मनोगत व्यक्त करताना सौ. हर्षरेखा शाईवाले यांनी मुख्य डाकघरात करण्यात आलेल्या विविध सुधारणा, स्वच्छता आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.


अध्यक्षीय भाषणात श्री. हेमंत खडकेकर यांनी कर्मचारी कल्याणासाठी सुधारित मनोरंजन कक्ष, प्रशिक्षण केंद्र, स्वच्छ कार्यालयीन परिसर आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमास श्री. सोमनाथ काळे (वरिष्ठ डाकपाल, सोलापूर मुख्य डाकघर), श्री. प्रफुल्ल बंगाले (सहाय्यक अधीक्षक), श्री. संदीप घोडके (सहाय्यक अधीक्षक), श्री. राहुल शित्रे (तक्रार निवारण अधिकारी), श्रीरंग रेगोटी (लेखापाल) तसेच सोलापूर डाक विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *