प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर येथील तहसील कार्यालयाशेजारी महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या परिसरात असलेली जुनी सरकारी दवाखान्याची इमारत सध्या अत्यंत पडीक अवस्थेत असून संबंधित जागा अनेक दिवसांपासून निष्क्रिय पडून आहे. या जागेचा नागरिकांच्या सोयीसाठी उपयोग करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तहसील कार्यालयात दररोज तालुक्यातील विविध गावांमधून शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी ये-जा करत असतात. त्यामुळे परिसरात दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, तहसील कार्यालय परिसरात वाहन पार्किंगची कोणतीही ठोस व नियोजित व्यवस्था नसल्याने नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत.
यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषतः कार्यालयीन वेळेत नागरिक, कर्मचारी व व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाशेजारील पडीक सरकारी दवाखान्याची इमारत पाडून त्या ठिकाणी प्रशस्त व नियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यामुळे वाहनांची योग्य पार्किंग होऊन रस्त्यावरील गर्दी कमी होईल तसेच वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या मागणीसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर रमेश काका चिवचिवे कदम, किरण कदम, विक्रम कदम, गणेश कदम, लोहार, अण्णासाहेब मगर यांच्यासह इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रशासन यावर कितपत तत्परतेने निर्णय घेते, याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
