प्रतिनिधी : प्रतीक वाघे
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूर येथे येत असतात. मात्र सध्या बिडकर पायऱ्यांमार्गे मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. पायऱ्यांसमोरील परिसरात साचलेल्या घाण पाण्यामुळे भाविकांना अक्षरशः गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत मंदिरात जावे लागत असून यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष तानाजी खांडेकर यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भाविकांसाठी तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बिडकर पायऱ्यांसमोरील नाले व गटारांतील पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब भाविकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. मंदिरात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने अनेकांना घाण पाण्यातूनच वाट काढत दर्शनासाठी जावे लागत आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे साचलेल्या पाण्यात भाविकांच्या चपला तरंगताना दिसत आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चपला पाण्यात वाहून जाणे किंवा एकमेकांत मिसळल्याने दर्शनानंतर स्वतःच्या चपला शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. काही भाविकांच्या चपला हरवल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. दूरवरून आलेल्या भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून उन्हाळा व पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पाऊस किंवा उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक शेड अथवा निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने भाविकांना उघड्यावरच थांबावे लागत आहे.
तुळजापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. अशा ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आणि स्वच्छतेच्या समस्या कायम राहणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनाद्वारे बिडकर पायऱ्यांसमोरील साचलेल्या घाण पाण्याचा तात्काळ निचरा करणे, नाले व गटारांची नियमित साफसफाई करणे, सुरक्षित व स्वच्छ प्रवेशमार्ग उपलब्ध करून देणे, चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था उभारणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करणे, पाऊस व उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारणे तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय भाविकांच्या सुविधांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास भाविकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, हे निवेदन मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष तानाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, तुळजापूर तालुका सचिव दयानंद क्षीरसागर यांच्यासह मानवी हक्क अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते.
