तुळजापूर तालुक्यात खंडणीसाठी विद्युत टॉवरची तोडफोड; १ कोटी २० लाखांचे नुकसान, नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

प्रतिनिधी : प्रतिक वाघे


तुळजापूर तालुक्यातील मुर्दा शिवारात टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या १३२ के.व्ही. क्षमतेच्या विद्युत वाहक टॉवरचे लोखंडी खांब गॅस कटरने कापून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी १० लाख रुपयांची खंडणी मागून धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखली भगवान पाटील (रा. मुर्दा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने दि. २२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजण्यापूर्वी मुर्दा शिवारातील शेत गट क्रमांक २९७/२ येथे फिर्यादी पार्थ जनकराव त्रिवेदी (वय ३०, व्यवसाय – इलेक्ट्रिक इंजिनियर, मूळ रा. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या ह.मु. लातूर) यांच्याकडे आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


“पैसे दिले नाहीत तर विद्युत टॉवर कापून मोठे नुकसान करतो,” अशी धमकी आरोपीने दिली होती. त्यानंतर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने उभारलेल्या १३२ के.व्ही. क्षमतेच्या विद्युत वाहक टॉवर क्रमांक २१ चे चारही लोखंडी खांब गॅस कटरच्या सहाय्याने कापण्यात आले.


विशेष म्हणजे, संबंधित विद्युत लाईन सुरू असताना हे कृत्य करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. विद्युत वाहक टॉवरचे खांब कापल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून कंपनीचे सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी फिर्यादी पार्थ त्रिवेदी यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ११०, ३२४(५), १२५ तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३९, १४० आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या गंभीर प्रकारामुळे औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीच्या हेतूविषयी आणि या प्रकरणामागील इतर शक्य तितक्या संबंधांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *