स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; हायवेवरील चालत्या ट्रकमधून चोरीस गेलेल्या २ लाख ९ हजारांच्या मेंढ्या २४ तासांत जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव : येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना दि. २३ मे २०२६ रोजी घडली होती. या घटनेचा गांभीर्याने तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत चोरीस गेलेल्या सुमारे २ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या मेंढ्या जप्त करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार विशेष पथके रवाना करण्यात आली होती. स्थागुशा पथक, RCP पथक क्र. १ आणि QRT पथक यांनी येरमाळा परिसरातील हायवेवरील ब्रिज परिसरात तपास सुरू केला.


तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी व उमरा पारधी पिढीतील काही इसमांनी हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरी करून आणल्या असून त्या उमरा पिढीजवळील बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.


माहिती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तात्याराव भालेराव, पोलीस कर्मचारी संतोष तिघाडे, संदीप चौघुले यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित ७ ते ८ इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.


त्यानंतर पोलिसांनी लाल रंगाच्या टमटमची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला संपर्क करून मेंढ्यांचे वर्णन सांगितले असता, त्या आपल्या ट्रकमधून चोरीस गेलेल्या असल्याची खात्री फिर्यादीने दिली.


पोलिसांनी मेंढ्या व टमटम असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात जमा केला आहे.


ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोना संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहित दंडनाईक तसेच RCP पथक क्र. १ व QRT पथक यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *