प्रतिनिधी : प्रतिक वाघे
नळदुर्ग (ता. तुळजापूर) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 27 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फेब्रुवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गावाजवळील शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला धमकावून हा प्रकार लपवून ठेवण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर घटनेबाबत पीडित महिलेने दि. 01 एप्रिल 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(एच)(एम), 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम 3(1)(डब्ल्यू)(i)(ii), 3(2)(व्हिए), 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
