प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. १२ जून २०२६ रोजी येरमाळा परिसरात करण्यात आली.
पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पथकाकडून कारवाई सुरू होती.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. झगडे गल्ली, भूम, ता. भूम, जि. धाराशिव) हा आंदोरा येथे जात पंचायतसाठी आला असून, तो आंदोरा येथील हॉटेल निसर्गसमोर थांबलेला आहे.
त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वरिष्ठांना माहिती देऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी हॉटेल निसर्गसमोर थांबलेल्या संशयित इसमाला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेला लोखंडी धातूचा लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी कट्टा तसेच पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
या कारवाईत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली.
