प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातील विकासासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांवर गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. शहरातील नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या निधीतून शहरातील लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये दर्जेदार रस्ते उभारणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही कामे न करता खाजगी विकासकांच्या प्लॉटिंग क्षेत्रांमध्येच मोठ्या प्रमाणात रस्ते बांधकाम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे शहरातील जुन्या व दाट लोकवस्तीच्या भागांतील रस्ते अद्यापही दयनीय अवस्थेतच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरविकास विभागाच्या नियमांनुसार, खाजगी विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, नाली व इतर मूलभूत सुविधा संबंधित विकासकांनी स्वतः उभारणे आवश्यक असते. तरीही शासनाच्या निधीतून अशा कामांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे शासकीय पैशांचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, या प्रकल्पातील काही कामे राजकीय हस्तक्षेपातून ठरवली गेल्याचा आरोपही होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामांचे वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. काही ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे सादर करून काम मिळवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून कामांची गुणवत्ता, निधीचा वापर आणि निविदा प्रक्रियेची पडताळणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तुळजापूरच्या विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या कथित गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
