धाराशिव : जिल्ह्यातील पवनचक्क्यांमधून अॅल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ७५० किलो वजनाच्या सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांच्या अॅल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील एकूण ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बालाजी उर्फ आवड्या अजिनाथ शिंदे (वय २४) व शहाजी भीमराव शिंदे (वय ३२, दोघे रा. मांडवा, जि. धाराशिव) यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तुळजापूर व वाशी तालुक्यातील नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी, जीनर व दहिफळ परिसरातील पवनचक्क्यांच्या खांबांवरून अॅल्युमिनियम तारा चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता अशाच प्रकारचे एकूण ८ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या कबुलीनंतर पंचनामा करून ७५० किलो वजनाच्या ३.७५ लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या.
तपासादरम्यान आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावेही उघड केली असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ताब्यातील आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
पवनचक्कीतील अॅल्युमिनियम तारा चोरी करणारी टोळी जेरबंद; ८ गुन्हे उघड, ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
