धाराशिव : मौजे आरणी येथील गणपती भास्कर साबळे यांना लमाण तांडा वस्ती जवळ घर बांधण्यास ग्रामपंचायत स्तरावरून अडथळा केला जात असल्याचा आरोप करत संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद धाराशिव येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आरणी शेत शिवारातील लमाण तांडा वस्ती जवळ गणपती भास्कर साबळे यांची स्वतःची जागा असून त्या जागेची ८-अ नक्कल मध्ये भोगवटदार म्हणून नोंद आहे. तसेच त्यांनी त्या जागेचा कर नियमानुसार भरलेला असून करपावती देखील उपलब्ध आहे. भोगवटदार म्हणून नोंद असताना व करपावती भरलेली असतानाही त्यांना घर बांधण्यास अडथळा करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी सुमारे १५० घरे बांधलेली असून त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा करण्यात आलेला नाही. मात्र गणपती साबळे हे गरीब असून अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचे असल्यामुळे त्यांना जाणूनबुजून घर बांधण्यास अडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच परिसरात इतर लोकांनी पक्की घरे बांधलेली असतानाही साबळे यांनाच अडथळा केला जात असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी क्षिरसागर व सरपंच यांना तात्काळ आदेश देऊन साबळे यांना घर बांधण्यास अडथळा करू नये, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा न्याय मिळवण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मानवी हक्क अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मानवी हक्क अभियानाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल, जिल्हा सचिव मोहन ताटे, जिल्हा संघटक शिवाजी कांबळे, धाराशिव तालुका अध्यक्ष जनार्धन वाळवे, तुळजापूर तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर आणि उमरगा तालुका अध्यक्ष शिवकांत गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आरणी येथे घर बांधण्यास अडथळा; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईची मानवी हक्क अभियानाची मागणी
