पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्वरचा धाक; पुण्यातील तरुणाविरुद्ध वाशी पोलिसांत गुन्हा

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


वाशी पोलिसांची कारवाई : शांततेचा भंग करत नागरिकांना घाबरवल्याप्रकरणी आर्म अॅक्टसह गुन्हा दाखल


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पार्डी फाटा येथे दारूच्या नशेत रिव्हॉल्वरचा धाक दाखवत नागरिकांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन पांडुरंग आठरे (रा. प्लॉट नं. C-103, अध्या संकल्प सोसायटी, गायकवाड नगर, दिघी, हवेली, जि. पुणे) याने दि. 10 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10.15 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान पार्डी फाटा येथे कैलास भोसले यांच्या हॉटेलसमोर गोंधळ घातला. आरोपी हा दारूच्या नशेत असून त्याच्याकडील रिव्हॉल्वरचा धाक दाखवत फिर्यादी सिद्धार्थ मच्छिंद्रनाथ मोरे (वय 21, रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव) तसेच परिसरातील इतर नागरिकांना घाबरवून परिसरातील शांततेचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी सिद्धार्थ मोरे यांनी दि. 12 मे 2026 रोजी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 125 तसेच आर्म अॅक्ट कलम 30 आणि मद्यनिषेध कायदा कलम 85(1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


घटनेमुळे पार्डी फाटा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *