प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : धाराशिव शहरातील बसस्थानक परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत चोरीच्या चार मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
दि. २२ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत फिरत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणावरून माहिती मिळाली की, दोन इसम अंबालना हॉटेलसमोरील चौकात चोरीच्या मोटरसायकलींसह थांबले आहेत.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे राजेश उर्फ राजा परमेश्वर बनसोडे (वय २१, रा. साठे नगर, धाराशिव) व अतिष हनुमंत सगर (वय २२, रा. भक्ती मार्ग, सांगोला चौक झोपडपट्टी, पंढरपूर, जि. सोलापूर, ह.मु. गावसुद, धाराशिव) अशी सांगितली.
पोलिसांनी मोटरसायकलींबाबत अधिक चौकशी केली असता आरोपींनी सदर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून अंदाजे ६० हजार रुपये किंमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या.
जप्त केलेल्या मोटरसायकलींसह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सपोनि श्री. अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे तसेच TAW पोलीस अंमलदार बिराजदार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
फोटो क्रिएट करा
