प्रतिनिधी : प्रतिक वाघे
६ लाख ३४ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
धाराशिव : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत येडशी येथून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारी इनोव्हा कार पकडली. या कारवाईत विदेशी दारूच्या बाटल्या, इनोव्हा कार असा एकूण ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दहीहांडे हे येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमएच १५ बीएक्स ६८२० क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता चालकाने आपले नाव सुभाष भिमराव उर्फ लाला काळे (वय ३३, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले. तर पाठीमागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने आपले नाव दादा रामा काळे (वय ४६, रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, धाराशिव) असे सांगितले
पोलिसांनी वाहनाची सखोल पाहणी केली असता पाठीमागील सीटमध्ये विदेशी दारूच्या बॉक्सचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा कारसह विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी सुभाष भिमराव काळे व दादा रामा काळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण व चालक पोलीस कॉन्स्टेबल दहीहांडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
