प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. ११ जून : सरकारी जागेच्या कथित विक्री व्यवहाराबाबत तक्रार केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चे धाराशिव जिल्हाप्रमुख राज धज यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
राज धज यांनी ११ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने सन २००३ मध्ये सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील जागा आरक्षित करून मोबदला देत अधिग्रहित केली होती. मात्र, त्यानंतर काही व्यक्तींनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या क्षेत्रातील जमिनीची विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात यापूर्वीही संबंधित व्यवहाराची चौकशी करण्यासाठी तक्रार करण्यात आली होती.
खरेदीखत व त्यानंतरचे दस्तऐवज तपासल्यानंतर सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील सुमारे ३० आर क्षेत्र नगरपालिकेच्या मालकीचे असल्याचे दिसून येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडेही तक्रार देण्यात आली होती; मात्र संबंधित कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज धज यांच्या म्हणण्यानुसार, १० जून रोजी ते सहजिल्हा निबंधक कार्यालयात गेले असता संबंधित कर्मचारी तेथे आला होता. चर्चा झाल्यानंतर कार्यालयाबाहेर संबंधित कर्मचाऱ्याने “तू माझ्या नादाला लागू नकोस, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच भविष्यात आपल्यावर हल्ला, शिवीगाळ किंवा खोटे गुन्हे दाखल झाल्यास त्यास संबंधित कर्मचारी आणि व्यवहाराशी संबंधित व्यक्ती जबाबदार राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
निवेदन देताना कुमार गायकवाड, प्रमोद कांबळे आणि अनिल वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
