धाराशिव मेडिकल कॉलेजमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव; रुग्णांना सोलापूरला पाठवण्यावरून संताप

Spread the love


प्रतिनिधी|धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक तथा शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना यापूर्वी रक्तदाबाचा (बीपी) त्रास असल्याने ऑपरेशनपूर्वी कार्डिओलॉजिस्टचा सल्ला आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला.


या घटनेमुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण असून “धाराशिवचे मेडिकल कॉलेज हे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टीपुरतेच मर्यादित आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले. विविध गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती आधीच कमकुवत असताना खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा लाखो रुपयांचा खर्च परवडणे कठीण होते. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हा अनेकांसाठी एकमेव आधार आहे. मात्र तेथेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील, तर करोडो रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा नेमका उपयोग काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सीटी-स्कॅन यंत्रणा अनेकदा बंद अवस्थेत असल्याची तक्रारही त्यांनी केली. ऑर्थोपेडिक विभागातील अनेक रुग्णांना विविध कारणे सांगून खासगी रुग्णालयांकडे वळवले जात असल्याची माहिती रुग्णांकडून मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे काही खासगी रुग्णालयांशी संगनमत तर नाही ना? असा संशय नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनीही धाराशिव मेडिकल कॉलेजमधील एमआरआय मशीन आणि कॅथलॅब बंद का आहेत? असा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते


तसेच जिल्ह्यातील अनेक गंभीर रुग्णांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवताना अर्ध्या वाटेतच प्राण गमावल्याची अनेक उदाहरणे असल्याचा दावा मनोज जाधव यांनी केला. त्यामुळे या गंभीर बाबीकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी व जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *