प्रतिनिधी : प्रतिक वाघे
धाराशिव : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीस अटक केली असून चोरीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई दि. १८ मे २०२६ रोजी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी पाटीजवळ करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास, फरार आरोपींचा शोध तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, महिला पोहेकॉ शोभा बांगर व चालक पोकों दहीहांडे हे पथक कन्हेरवाडी परिसरात आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रशांत उर्फ भमड्या बालाजी काळे रा. कन्हेरवाडी ता. कळंब व अशोक नाना पवार रा. बावी ता. वाशी हे दोघे मोटरसायकलवरून गावठी शस्त्रासह कन्हेरवाडी पाटी येथे येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेटची मोटरसायकल येताना पाहिली. पोलिसांनी वाहन थांबवताच त्यातील एक आरोपी गावठी कट्टा टाकून घटनास्थळावरून फरार झाला. तर दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव अशोक नाना पवार, रा. बावी शिवार काटशिवरी पारधी पिढी, ता. वाशी, सध्या रा. कन्हेरवाडी ता. कळंब असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला गावठी कट्टा आढळून आला. फरार आरोपीचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भामड्या बालाजी काळे असल्याचे समोर आले.
दरम्यान, आरोपीकडील मोटरसायकलची चौकशी केली असता ती मुरुड, जि. लातूर येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात खात्री केली असता सदर दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोभा बांगर व दहीहांडे यांच्या पथकाने पार पाडली.
