प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा गावात मोबाईल नेटवर्कच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून, जिओ कंपनीच्या सेवेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून गावातील जिओ नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक वेळा दोन ते तीन तासांपर्यंत मोबाईल रेंज पूर्णपणे गायब होत असल्याने दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे.
मेडसिंगा गावाची जिओसोबतची कहाणी काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय ठरली होती. गावात जिओचा टॉवर सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी एकजुटीचे उदाहरण दाखवत मोठ्या प्रमाणावर इतर कंपन्यांचे सिमकार्ड जिओमध्ये पोर्ट केले होते. संपूर्ण गावाने एकमुखाने घेतलेला हा निर्णय परिसरात चर्चेचा विषय बनला होता.
मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून ज्या कंपनीवर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला, त्याच कंपनीच्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नेटवर्क नसल्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. तसेच ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, आरोग्यविषयक तातडीचे संपर्क आणि रोजच्या मोबाईल वापरावरही परिणाम होत आहे.
“आम्ही संपूर्ण गावाने एकत्र येऊन जिओला साथ दिली होती. आता कंपनीनेही ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन सेवा सुधारावी. अन्यथा पुन्हा एकदा गाव एकत्र निर्णय घेईल,” अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नेटवर्क समस्येवर तातडीने उपाययोजना न झाल्यास संपूर्ण गावाने दुसऱ्या मोबाईल कंपनीकडे वळण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीच्या बळावर निर्णय घेणाऱ्या मेडसिंगा ग्रामस्थांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.
“एकदा एकजुटीने जिओ स्वीकारले… आता नेटवर्कसाठी पुन्हा एकदा एकीची ताकद दाखवणार का मेडसिंगा?”
