प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. 12 : धाराशिव शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यांनी दि. 11 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात व्यापक कारवाई केली. महत्त्वाच्या रस्त्यांवर करण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण 488 कारवाया करून तब्बल ₹4 लाख 53 हजार 500 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
यासोबतच जिल्ह्यात अवैध मद्य विक्री, जुगार, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या वाहनांवर तसेच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
ढोकी परिसरात अवैध गावठी दारूवर धडक कारवाई
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मद्यविक्रीविरोधात एकाच दिवशी चार स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. वस्तादनगर येथील समाबाई मोहन पवार (वय 60) यांच्याकडून 25 लिटर, दत्तनगर येथील ताईबाई कालीदास शिंदे (वय 50) यांच्याकडून 35 लिटर, कोंड येथील फातीमा जगदीश जाधव यांच्याकडून 30 लिटर, तर जागजी येथील राहुल जालिंदर हिंदे यांच्याकडून 20 लिटर अशी एकूण 110 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या अवैध मद्याची एकूण अंदाजे किंमत ₹11 हजार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम 65 (ई) अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही विलास चंद्रशा चंडकापुरे (वय 48), रा. हिप्परगा राव यांच्याकडून 28 लिटर गावठी दारू, अंदाजे ₹3 हजार किंमतीची, जप्त करण्यात आली. याप्रकरणी महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहरात मटका जुगारावर छापा
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साठे चौक येथे दि. 11 ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मेहराज इकराम शेख (वय 38), रा. वैराग रोड, धाराशिव हा मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्य व ₹3 हजार रोख रकमेसह आढळून आला.
पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.
रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवरही गुन्हे
कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होळकर चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या वाहने उभी केल्याप्रकरणी किशोर पांडुरंग शिंदे (वय 35) आणि किरण गौतम लोकरे (वय 32) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
दोघांच्या ताब्यातील छोटा हत्ती व चारचाकी अॅपे ही वाहने रस्त्यावर धोकादायकरीत्या उभी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंड्यात घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह ₹1.70 लाख रोख लंपास
परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणकेश्वर येथे विश्वनाथ वसंत राउत (वय 48) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेपासून 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
चोरट्याने कपाटातील 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ₹1 लाख 70 हजार रोख, असा एकूण ₹3 लाख 67 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 331 (4), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव, कळंब आणि आनंदनगर परिसरात दुचाकी चोरी
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळामारोती चौक परिसरातील चायबॅक हॉटेलसमोरून ₹40 हजार किंमतीची मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कळंब येथे डिकले निवास, तांदुळवाडी रोड येथून ₹35 हजार किंमतीची होंडा युनिकॉर्न चोरीला गेली. तर आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समता कॉलनी परिसरातून ₹30 हजार किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. दोन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सावरगाव येथे सोलार प्रकल्पातील केबल चोरी
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरगाव येथील ड्युनंग इंडस्ट्रीज प्रा. लि. व विनीती ऑरगॅनिक्स प्रा. लि. यांच्या सोलार प्लॉटमधून 700 मीटर कोअर स्ट्रिंग निगेटिव्ह केबल आणि 500 मीटर पॉझिटिव्ह केबल, असा सुमारे ₹90 हजारांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 324 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेसळयुक्त खत विक्रीप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भेसळयुक्त खत विक्रीप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे.
अनिल धर्माप्पा नागराळ, सुचेता खंडेराव स्वामी आणि ओंकार खंडेराव स्वामी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. संबंधित खत उत्पादन कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द असतानाही मिश्र खताचे भेसळयुक्त उत्पादन करून ते अणदुर व नळदुर्ग येथील कृषी सेवा केंद्रांमधून विक्री केल्याचा आरोप आहे.
10.20.20, 20.20.00 आणि 18.18.10 या प्रकारच्या खतांच्या एकूण बॅगमध्ये भेसळयुक्त खत आढळून आले असून, त्याची अंदाजे किंमत ₹3 लाख 1 हजार 250 आहे. उर्वरित खत विक्रीच्या उद्देशाने गोदामात ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3 (5), अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 मधील संबंधित कलमांनुसार नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच अवैध दारू विक्री, मटका-जुगार, रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहने उभी करणे, चोरी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भेसळयुक्त खत विक्रीविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; 488 वाहतूक कारवायांत ₹4.53 लाख दंड वसूल अवैध दारू-जुगारावरही कडक कारवाई
